कधीतरी पहाटे.

कधीतरी पहाटे

एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी, आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी, यासारखं सुख ते काय?

कधीतरी भांडताना एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?

कधीतरी रविवारी सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?

कधीतरी रडताना तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?

कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?

कधीतरी चुकताना मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?

कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?

कधीतरी जगताना जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस असं म्हणता यावं
यासारखं आयुष्य ते काय?
Share on Google Plus

About Hanumant Nalwade