नसतेस घरी तू जेंव्हा जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो.
नभ फाटून वीज पडावी कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो.
येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा तव गंधावाचून जातो.
तव मिठीत विरघळणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे मी तसाच अगतिक होतो.
तू सांग सखे मज काय मी सांगू या घरदारा,
समचा जीव उदास माझ्यासह मिणमिण मिटतो.