वयात जे जे करायचं .

ज्या ज्या वयात जे जे करायचं त्या त्या वयात ते ते करायचं!
लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावायचं
तरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...

ज्या ज्या वयात जे जे करायाचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निवृत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!
लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथे मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुध्दा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात साऱ्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं! तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात!
वाऱ्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणाऱ्या मेघासारखं बोलकं होता यायला हवं
अंधाराच्या गर्भामधे ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी!
कुठल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...
तरीही...ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!
Share on Google Plus

About Hanumant Nalwade