प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?

"प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?"
घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
"प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?"
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.
ढग नाही बरसले तेंव्हा
वारा नाही सुटला तेंव्हा
मोरही नाही दिसला नाचताना
एक कावळा तेवढा ओरडला
त्याला मात्र सतारीच्या झंकाराचा भास झाला.

अविश्वासानं त्यानं थरथरत
तिचा हात हातात घेतला
छाती फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
चंद्र नाही हसला तेंव्हा
मोगरा नाही फुलला तेंव्हा
गाणंही नाही सुचलं गुण्गुणावं म्हणताना
एक स्कूटरवाला तेवढा शीवी हासडून गेला
त्याला मात्र सनईच्या ओल्या सुरांचा भास झाला.

मग पुढं लग्न-बिग्न, पोरं-बिरं
संसार-बिंव्सार करून झालं
चिमणा चिमणीचं एकच पाखरू
दूर विदेशात उडून गेलं
एके दिवशी घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
"जमलं का गं मला, तुला सगळी सुखं द्यायला?"
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं
प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर? प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर? Reviewed by Hanumant Nalwade on February 27, 2011 Rating: 5
Powered by Blogger.