निजले अजून आहे

सरले बरेच काही, उरले अजून आहे तुटले तरी जरासे, जुळले अजून आहे

वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे

संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे
वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे
वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे
आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे ते भोगणे जरासे, उरले अजून आहे

उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे वाळूत बांधलेले, टिकले अजून आहे
अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे


Share on Google Plus

About Hanumant Nalwade