एकदा एकटी राहून पहा...


लग्न झालेली ती... परतून आली माझ्याकडे
बोलली सार काही मागे सोडून ...आले आहे तुझ्याकडे...

अग वेडे..
जा पुन्हा त्याच वाटेवर... जा फिर तू मागे
इतके कच्चे नसतात राणी... जगण्याचे हे धागे

अरे...
एकटी पडले आहे मी...समजत का नाही तुला...
संपली आस ही जगण्याची...तुटला स्वप्न झुला...

हातात हात घेऊन बोललो तिला...
एकटेच असतो ग आपण...जगण्याच्या या वाटेवर
देतो सोबत कोणी... मिळेल सोबत याच आशेवर...

अशा कातरवेळी...नकळत देई कोणी हाती हात...
जिवनसाथी वचनबद्ध तो...कायम देईल तुला साथ...

बिकट अशा या वाटेवर...असेल कायम तो तुझा सोबती...
तुझा होऊनि जगेल तुझ्यात...नसेल जेव्हा कुणी भोवती...

तो तर माझा नाहीच... सारी नाती खोटी...
काळोखाचे साम्राज्य जिवनी ... प्रेमभावना परकी...

अग
जीवन लाभते फक्त एकदाच... प्रेम त्यावर करून पहा...
एकटेपणातही सारे गवसेल... एकदा एकटी राहून पहा...

तू नव्हतीस सोबत तरीही ...
शोधली आहे वाट माझी मी... तुझी तुलाही सापडेल कधी...
दु:खाची दे कात टाकून... दु:खात सुखही सापडेल कधी...

एकटाच मी चालत होतो...चालतो आहे... चालत राहीन...
क्षण मोत्यांचे वेचत होतो... वेचतो आहे... वेचत राहीन...

Previous Post Next Post