नकोस वेडे प्रश्न विचारू.

नकोस वेडे प्रश्न विचारू माझ्यापाशी उत्तर नाही,
उघडे पडले घाव जुने तर झाकायाला अस्तर नाही..

किती वेळ अन दिवस भेटलो याची कोणी गणती केली,
त्या त्या वेळी असे म्हणालो आता भेटू नंतर नाही..

बदललीस तू सहजच रस्ता आता तो सवयीचा झाला,
सवयीचा नक्की झाला कि त्यावाचून गत्यंतर नाही..

समीप आलो उगीच वाटले खरे समांतर चालत होतो,
किती बदलले रस्ते तरीही आपल्यामधले अंतर नाही..

नको दरवळू अशी तू तरी तुझा गंध माझ्यात असुदे,
बागेमध्ये फुल व्हावया माझ्यापाशी अत्तर नाही..
Previous Post Next Post