ओढ तुझी

तुझ्या स्पर्शाने वारा पुरता दिवाना झालाय...
विसरून गेला स्वतःची दिशा...तुझ्यात असा हरवून गेलाय...
माळरानी घोंघावतोय एकटा...
बघ जरा तू जाऊन एकदा...
माझ्यासारखा बहुदा तोही वेडापिसा झालाय...

डोळ्यातल्या पाण्याला आज वेगळीच धमक आलीये...
प्रत्येक अश्रुला बघ जवळून तुझीच चमक आलीये...
कदाचित तुला पाहून अश्रू प्रेम व्यक्त करतायत...
बघ त्यांना डोळे भरून एकदा...
माझ्यासारखी त्यांना सुद्धा तुझी सवय झालीये...

भर उन्हात सूर्य कसा...आज थंड झाला...
तुझ्या ओलाव्याने तोही पुरता... ओला चिंब झाला...
डोंगराच्या पंखांखाली... तुझ्या वाटेवर डोळे लावून बसला...
जा त्याला ये भेटून एकदा...
माझ्यासारखा तोही तुला भेटण्यासाठी थांबला...

काटा बाबळीचा... आता रुतत नाही कुणाला...
रक्त तुझे सांडले...हे सलतंय त्याच्या मनाला...
घाव तुला झालेला... छळतो पुन्हा पुन्हा त्याला...
आहेस तू बरी... सांग त्याला एकदा...
माझ्यासारखी तोही करतोय काळजी क्षणाक्षणाला...

साऱ्यांनाच लागलीये ओढ तुझी... कदाचित माझ्यासारखी...
तू ये गंधुनी... बहरून ये रातराणीसारखी...
एकदा... फक्त एकदा तरी येऊन जा...
दरवळू दे तनमनी चाहुल तुझी... एकदाच तू येउन जा...
मनाच्या अंगणी राहून जा...

Previous Post Next Post