उटण्यांचा सुवास,बंबाचा धूर
फराळाची ताटं,दारावरची तोरणं
आधणाचं पाणी,फोडलेली चिरांटी
फटाक्यांचे आवाज,मातीचे किल्ले
किल्ल्यांवरचं पोपटी,कोवळं जंगल
नवे कोरे शिवाजीमहाराज !
नवे जुने मावळे, त्यातच मोटारी आणि
बोगद्यातून डोकावणार्‍या आगगाड्या सुद्धा...
सारवलेलं अंगण,अंगणातलं तुळशीवृंदावन,
समोर रेखलेली रंगीत रांगोळी,पणत्यांची आरास ,
दारात झुलणारे आकाशदिवे,
आणि नव्या कोर्‍या परकर पोलक्यातली मी...
पणत्यात तेवणार्‍या मंद वाती
राहिल्यात सातासमुद्रापलिकडे,
पण दिवाळी मनात जागते आहे...
नाताळच्या बाजारात मी दिवाळीसाठी पणत्या शोधते
रंगीत,सुवासिक मेणबत्त्या आणून घरभर लावते.
दिवाळी पहाटेची सुरुवात मग
भारतातल्या 'फोन'ने होते.
हा दूरध्वनी ... दूर चा आवाज खूप जवळ आणतो
पापण्यांच्या कडा ओलावतो; इथल्या आणि तिथल्याही...
इथले सुह्रद मग फराळाला येतात,
चिवडा,करंज्या,शंकरपाळे खाताना
कुतुहलाने अनेक प्रश्न विचारतात.
उत्साहाची कळी मग पुन्हा उमलते,
आणि मनातली रांगोळी घरभर उमटते...
सर्वांना ही दिवाळी आणि येणारे नूतन वर्ष भरपूर आनंदाचे,
भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जाओ ह्या शुभेच्छांच्या.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top