मी खूपच आश्वस्त आहे.

आई -बाबांचे बोट असे धरुन धरुन
चालणार कधी सुटी ही वाटत होते राहून राहून

काय ही शिकणार नीरस शाळेत जाउन
जीवन का उमगेल गणित-शास्त्र वाचून

ऊन्हात पोळणारे पाय जेव्हा दिसतात
जीवनाचा खरा धडा सुरु करुन देतात

दुसर्‍याचे दु:ख जाणता जेव्हा येईल

जीवनाच्या शिक्षणाला खरी सुरवात होईल

दुसर्‍याचे मन जेव्हा ओळखायला शिकशील
जीवनाचे कोडे थोडे उलगडायला लागशील

आता मी खूपच आश्वस्त आहे
जीवन हळूहळू तिच्यात उतरत आहे

मिळत नसेल बक्षीस, नसेल नंबर वर
संवेदनशील मन, उंचावेल जीवनस्तर....
Previous Post Next Post