क्षण असे...क्षण तसे...!


कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!
मुठीत मिटावे आर्त आकाश,नि विझवून टाकावेत तप्त तारे...
दूर लोटावा खिडकीतला चंद्र आणि फुंकून द्यावेत वेडे वारे...
कोंडावे स्वतःतच स्वतःला, बंद करून मनस्वी मनाची दारे ..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!

कित्येक क्षण असे येतात, की अनोळखी वाटतात सगळेच चेहरे...
सांगावे गाऱ्हाणे कुणाला, जेव्हा आपलेच होतात बर्फ,बधीर, बहिरे...
सकाळी मिरवलेल्या जखमांचे, रात्री छळतात जेव्हा तीव्र शहारे..
नको वाटते मलमपट्टी,चालतील काटे आतवर सलणारे गर्द गहिरे..
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!

कित्येक क्षण असे येतात, की समजत नाही, काय वाईट,काय बरे...
आपणच बांधलेल्या नीतीतत्वांच्या समाधीचे जेव्हा ढासळतात चिरे..
निराशेचे कल्लोळ मनात आणि आटून जातात इच्छेचे झरे...
कशासाठी जगायचे?....इथे कशाचेच नाही काही खरे...
कित्येक क्षण असे येतात, की वाटते संपवून टाकावे आता सारे...!

पण एखादा क्षण असाही येतो की, उठून ताठ उभे राहतात ढासळणारे...
पारंबीचे दोरही जिद्दीने सावरतात, कधीकधी वटवृक्ष कोसळणारे...
असा एखादा क्षणीक स्पर्श, शांत करतो त्रस्त जीव तळमळणारे..
असा एखादा क्षणीक शब्द, तोलून धरतो अवघे आयुष्य डळमळणारे...
अशा एखाद्या क्षणावरच जगतात माणसे, असे कित्येक क्षण मरणारे..!!
Previous Post Next Post